Ashtvinay Prakashan

History of Mahabodhi Temple and Vihar

 

महाबोधी मंदिर आणि विहाराचा इतिहास

    ज्या ठिकाणी सिद्धार्थाने वज्रनिर्धार करून संबोधी प्राप्तीसाठी ध्यानस्थ झालेत ते स्थळ म्हणजे वज्रस्थली. “रक्त सुकून जाईल, मांस कुजेल, हाडे तुटून जातील, पण मला ज्ञानप्राप्ती होईपर्यंत मी हे ठिकाण सोडणार नाही.” असा कठीणतम (वज्र) निर्धार घेऊन ध्यानस्थ झाल्याने या स्थळाला वज्रस्थळी असे संबोधले गेले. (या निर्धाराला प्रेरणासमान मानत कालांतराने वज्रयानी बौद्धांनी एक प्रतीक निर्माण केले). बोधिगयेला भेट दिल्यानंतर सम्राट अशोक यांनी वज्रस्थळीचे पवित्र अस्तित्व लोकाभिमुख करण्यासाठी दगडी चबुतरे निर्माण केलेत. एक हजार सुवर्ण मुद्रा देऊन बोधिवृक्षाच्या सभोवताल दहा फूट उंच भिंत बांधून वज्रस्थळी सुशोभित करून घेतली. बुद्धाच्या चक्रमण स्थळी प्रतिकात्मक सिरीपाद निर्माण केलेत, जे आजही बघितले जाऊ शकतात. सम्राट अशोकाने तिथे एक चैत्य बांधले (इ.पू. २६०), कारण ती तत्कालिन परंपरा होती. त्यावरच पुढे मंदिराचे निर्माण केले गेल्याचे म्हटले जाते.

    त्यांच्यापश्चात सम्राट कनिष्क यांचे वंशज सम्राट हुविष्क (इ.स. १२०-१६०) यांच्या कारकिर्दीत तिथे मंदिर निर्माण केले गेले; हेच ते महाबोधी मंदिर होय. ज्याला इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी तीर्थ यात्री हुएन त्सांग यांनी बघितले होते आणि त्याला मोहोपुटी असे म्हटले, यावरून महाबोधी हे संबोधन तेव्हापासून अथवा तेव्हा सुद्धा अस्तित्वात असल्याचे दिसून येते.

      सम्राट अशोक यांचा राज्याभिषेक इ.पू. २७० ला होतो आणि त्याच्या पाच वर्षानंतर (इ. पूर्व २६५) ते बौद्ध धर्माची विधीवत दीक्षा घेतात. त्याच्या दोन वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व २६३ मध्ये कलिंग युद्ध घडून येते. त्याच्या दोन तीन वर्षानंतर (इ.पू.२६०) सम्राट अशोक धर्मयात्रा आरंभ करतात. महाबोधी मंदिराला सम्राट अशोक यांच्याद्वारे भेट देण्याचा हाच तो काळ होय.

      अशोक यांच्या दोन शतकांनंतर म्हणजे इ.पू.६० मध्ये कुरांगी, नागादेवी आणि सिरीमा या धनाढ्य दानशूर उपासिका वज्रस्थळीभवती दगडी स्तंभ उभे करून रेलिंगचे सौंदर्यकरण आणि सुवर्णविलेपन करतात. एकंदर काय तर तेव्हा मूर्तीपूजेची परंपरा नसल्याने वज्रस्थळी केवळ संरक्षित करण्याचे तसेच जिथे बुद्धाचा पदस्पर्श झाला तिथे सम्राट अशोक यांनी सिरीपाद कोरून घेतलेत. मात्र बोधीवृक्षाजवळ मंदिर बांधण्याची प्रक्रिया इ.स. १२० ते १६० दरम्यान पार पडली. याची शहानिशा अलेक्झांडर कनींगहॅम यांनी तिथे खोदकाम सुरू केल्यानंतर केली.

      तिथे गर्भगृहातील सिंहासनापुढे आढळलेल्या अवशेषात राजा हुविष्कच्या एका सुवर्णमुद्रेसोबतच काही चांदीचे पंचमार्क (टंकन केलेले) सिक्के मिळालेत. यावरून राजा हुविश्क या कनिष्क सम्राटाने बोधीगयेत बुद्ध मंदिर बांधले, असा निष्कर्ष निघतो. कुशाण साम्राज्याचे सम्राट कनिष्क प्रथम यांचे उत्तराधिकारी राजा हुविष्क होते. याच हुविष्क यांनी मथुरे शेजारी एक बौद्ध विहार सुद्धा बांधले. बोधिगया येथे बुद्धाच्या स्मृतीत मंदिर बांधण्याची सुरुवात राजा कनिष्क (इ.स. ७८ ते १०२) यांनी केल्याचे सुद्धा म्हटले जाते. ज्याला अंतिम रूप त्यांचा उत्तराधिकारी हुविष्क यांनी दिले.

     राजा कनिष्काच्या काळातच हारवन (काश्मीर) येथे चौथी बौद्ध संगिती पार पडली होती (इ.स. ७२) आणि तिथूनच महायान परंपरेला अधिकृत संमती मिळाल्याचे दिसून येते. कनिष्क राजाच्या काळात मूर्तिपूजा सुरू झाल्याने बोधीगया मंदिर बांधण्याचे श्रेय सम्राट अशोकाला जात नसून सम्राट कनिष्क-हुविष्क यांना जाते. सम्राट अशोकाने वज्रस्थळी च्या परिसरात एक विहार बांधले म्हणजे ते भिक्खू निवास होते (आजचे महाबोधी मंदिर नव्हे). भिक्खूंना ध्यान, आराम इत्यादिसाठीच्या त्या वास्तू होत्या. परंतु विहार आणि मंदिरातील फरक लक्षात न घेतल्याने सम्राट अशोकानेच बुद्धगया येथील महाबोधी मंदिर निर्माण केले अशी विपर्यस्त माहिती प्रसारित केली जाते. पण वस्तूस्थिती अशी आहे की, बुद्ध मूर्तीपूजा हा प्रकारच सम्राट अशोकाच्या काळात अस्तित्वात नव्हता. जेव्हा बुद्धापश्चात प्रतीक पूजा सुरू झाली तेव्हा एकीकडे सिरीपाद, बोधीवृक्ष, रिकामे सिंहासन, चैत्य इत्यादिंची प्रतीक पूजा सुरू होती तर दुसरीकडे यज्ञवंशीयांमध्ये यज्ञाद्वारे देवाची आळवणी करीत त्यायोगे आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची परंपरा होती.

     ज्या काळात मूर्तिपूजा सुरू झाली त्याच परंपरेच्या राजांनी बोधिगया येथे मंदिर निर्माण कार्य सुरू केले, तो महायानी होता. यास्तव बोधिगया मंदिर मुक्ती इत्यादिंचा विचार करताना थेरवाद, महायान, वज्रयान इत्यादिंची अनुक्रमिक वैचारीक विकास प्रक्रिया लक्षात घेत, बुद्धाशी निगडित जपणूक करावयाच्या संपदा, प्रेरणास्थळ, पवित्र /अति-पवित्र पूजनीय स्थळ या अर्थाने त्याकडे बघितले जाणे श्रेयस्कर.

     हुएन त्साँग यांनी जेव्हा इ.स. ६३७ मध्ये भेट दिली तेव्हा त्यांना तिथे दोन स्तूप आणि सहा विहार आढळलेत. तेव्हा मंदिराची उंची १६० ते १७० फूट असल्याचे त्यांनी नमूद केले. तेव्हा तिथे एक संघाराम सुद्धा होते जिथे १००० भिक्खूंच्या निवासाची सोय होती जे श्रीलंकेच्या राजाद्वारे बांधून दिले गेले होते. त्याच्या तीनशे वर्षानंतर इ.स. १०७० मध्ये पंजाबच्या शिवालिक पर्वत क्षेत्रातील राजा अशोक भल्ला यांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य भिक्खू धर्मरक्षीत यांच्या देखरेखित पार पाडले.

लेख:- डॉ. विनोद अनाव्रत.  

पुस्तक: – महाबोधि मुक्ती कोण पथे?